अव्यक्त प्रेम कथा : प्रसाद राजन क्षीरसागर यांच्या लेखणीतून

0

“तो” आणि “ती” दोघे प्रेमात आकंठ बुडालेले. “त्याला” “तिच्या”शिवाय काही सुचत नव्हतं तर तिच्या डोळ्यासमोर सतत त्याचाच चेहरा असायचा.

दोघे एकाच महाविद्यालयात शिकत होते. पहाता क्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. “ती” दिसायला अतिशय सुंदर … गुलाबाचं फूल जणू….अभ्यासात हुशार …स्वभाव शांत पण, कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे न पाहणारा निग्रही स्वभाव. तर “तो” साक्षात मदनाचा पुतळा….अभ्यासात सर्वासाधारण….त्याच्या वडीलांचा मोठा व्यवसाय…स्वभाव उथळ, शीघ्र कोपी…वडिलांच्या पैशाचा माज स्वभावातून झळकत होता. त्यात हा एकुलता एक….त्यामुळं त्याला शिक्षणाची फारशी गरजच नव्हती. बरोबर त्याच्या उलट तिची परिस्थिती …वडीलांची आर्थिक परिस्थिती सामान्य.. त्यात वर अजून दोन मुली….

“ती” सर्वात मोठी…त्यामुळं जास्तीतजास्त शिकून आपला व आपल्या कुटुंबाचा उद्धार केल्याशिवाय गत्यंतर नाही याची तिला जाणीव होती ..

‘कथेत’ अजून एक पात्र आहे. दोघांचा कॉमन “मित्र”..

हा ही दिसायला देखणा…अभ्यासातही हुशार…घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. स्वभाव मनमिळावू…दुसऱ्याचं मन कधीही न दुखावणारा…, या मित्रालाही मनातून “ती” आवडत होती. पण त्याने कधीच आपल्या मनीचे गूज तिला सांगितले नाही, कारण मित्राला माहिती होतं की “तिला” “तो” आवडत आहे आणि आपल्याकडे “ती” एक ‘मित्र’ या भावनेने पहातीय…तिच्या या भावनेचा आपण आदर केला पाहिजे अशी या मित्राची विचारसरणी होती.

महाविद्यालयाची कशीबशी दोन वर्षे करून अर्धवट शिक्षण सोडून ‘तो’ आपल्या वडिलांच्या व्यवसायात लक्ष देऊ लागला. आपोआपच त्याचं व तिचे भेटणेही कमी झालं. पण म्हणून प्रेम कमी झालं असं नव्हतं.

महाविद्यालयात तिचं अन् त्या मित्राचं भेटणं बोलणं वाढू लागलं होतं. मित्र सज्जन होता. मित्राने कधीच या परिस्थितीचा गैरफायदा घेतला नाही. पण, “त्याला” “तिचं” मित्रासोबत बोलणं फारसं आवडत नसे. आपण लवकरात लवकर लग्न करूया….असे तो तिला अनेकदा बोलूनही दाखवे. पण तिच्या मनात इतक्या लवकर लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याने ती दुर्लक्ष करे.

दिवसांमागून दिवस गेले …तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. आता “तो” लग्नासाठी हट्ट करू लागला …तिला नोकरी करून आपल्या वडीलांना मदत करायची होती बहिणींची शिक्षणं पूर्ण करायची होती.

पण, तो ऐकायला तयार नव्हता…बहिणींच्या शिक्षणाचा लग्नाचा खर्च मी करेन असे आश्वासन दिले. अखेर तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला समजावले व दोघांचे यथाशक्ति लग्न लावून दिले.

तीन वर्षे आनंदात गेली…दोघांच्यात छोट्यामोठ्या तक्रारी व्हायच्या पण ती एक पाऊल मागं घ्यायची. तो दिवसभर व्यवसायानिमित्त बाहेर असायचा…ती घरात बसून बसून कंटाळून जायची. तीन वर्षे झाली लग्नाला तरी घरात पाळणा हलत नव्हता …तिचे सगळे मेडिकल चेकप झाले, सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. वैद्य, हकीम झाले गूण येत नव्हता …मूल असतं तर त्याचे संगोपन करण्यात वेळ छान गेला असता….दिवसभर घरात भूतासारखं बसायचा कंटाळा आला होता…. तिला अजून शिकायची इच्छा होती. शिकण्याच्या निमित्तानं वेळ चांगला जाईल या उद्देशाने एकेदिवशी तिने आपली इच्छा त्याला बोलून दाखवली…त्याने स्पष्ट नकार दिला…”आमच्या घरात लग्न झालेल्या स्त्रिया महाविद्यालयात जात नाहीत ..” असे म्हणून तिची इच्छा मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याच्या आई वडीलांनीही आपल्या मुलाला साथ दिली. शिक्षणापेक्षा आम्हाला नातू दे …असे टोमणे मारत होते. ती मनातून फार दुःखी होती. आपला नवरा आपल्याला समजून घेत नाही ही खंत तिच्या मनात होती. आपलं दुःख महाविद्यालयातील त्या मित्राकडे फोनवरून बोलून दाखवत असे. मित्र तिला धीर देत असे.

एकेदिवशी त्याचं अन् तिचं मूल न होण्यावरून जोरजोरात भांडण झालं. तो म्हणत होता तू मला बाळ देऊ शकत नाहीस…तुझा काय उपयोग, तुझ्यासोबत लग्न करून पश्चात्ताप होतोय…ती फक्त इतकंच म्हणाली होती की, मी जसे मेडिकल चेकप केलंय तसं तू पण करून घे….म्हणजे नेमका दोष कुणाच्यात आहे ते समजेल…बास…. या बोलण्यावरून तो भयंकर चिडला होता…त्याच्या पौरूषावर संशय घेतला गेलाय असा समज करून डोक्यात राग घालून घेतला होता…ती शांत होती व निग्रही होती ठाम होती …तिने आपले म्हणणे कायम ठेवले होते….मेडिकल चेकप करायला घाबरतोस का ? असा खुला सवाल तिने केला….अन् त्याचं पित्त अधिक खवळलं…अन् त्या रागाच्या भरात त्यानं “तलाक तलाक तलाक” असा तीन वेळा उच्चार केला….”सायरा” (ती) तरीही शांत होती…याकुब (तो) रागानं थरथरत होता….सायराचं शांत असणं याकुबला अधिक खटकत होतं….त्यानं परत तीन वेळा “तलाक” हे शब्द उच्चारले ….

सायराला आपल्या अब्बूच्या घरी येऊन सहा सात महिने झाले…या सहा सात महिन्यात अरविंदने (सायरा व याकुबचा कॉमन मित्र ) सायराला खुपच मानसिक आधार दिला..एकदा दोनदा अरविंद याकुबला भेटून आला…त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला….पण, याकुबच्या पौरूषाबाबत सायराने केलेला सवाल स्विकारायची मानसिक तयारी नसल्याने, अथवा सायराचा प्रश्न खरा ठरला तर….या भितीने याकुबने अरविंदला आल्या पावली परत पाठवलं….तरी अरविंदने याकुबला समजावण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर अरविंदच्या प्रयत्नाला म्हणा किंवा सायराच्या अनुपस्थितीचं दुःख होत असल्याने म्हणा याकुब स्वतःचे मेडिकल चेकप करायला तयार झाला….अरविंदसोबत डॉक्टरांना भेटला …सर्व तपासणी केल्या ….रिपोर्टस आले… ते ही नॉर्मल होते. याकुबच्या मनातील भिती संपली…अन् त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला …माझी सायरा सायरा करून हळहळू लागला …

“हलाला” हा एकमेव मार्ग आहे ज्याने परत सायरासोबत तुला लग्न करता येईल….इस्लामी गुरूंनी याकुबला सांगितले…”हलाला” म्हणजे तीन वेळा तलाक दिलेल्या आपल्या पत्नीसोबत परत लग्न करायचे असल्यास सायराला अन्य पुरूषासोबत प्रथम लग्न करावे लागेल नंतर त्याच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करावे लागतील …या शरीरसंबंधानंतर त्या पुरूषाने सायराला तीन तलाक द्यायचा…मग परत याकुबला सायरासोबत लग्न करता येईल….याकुबला प्रश्न पडला की, कुणाला सायरासोबत लग्न करायला लावावे…बर… त्या माणसाने शरीरसंबंधानंतर तलाक द्यायला हवा…इतक्या सुंदर सायराला पाहून त्याने तलाक द्यायला नकार दिला तर ?? हा प्रश्न याकुबला सतावत होता…हलाला होण्यास सायरा राजी होईल का ?…हा ही प्रश्न होता….

तुझ्याशिवाय माझा दुसऱ्या कुणावरही विश्वास नाही….तेंव्हा तुलाच एका रात्रीपुरता सायराचा पती व्हावं लागेल….तू जर हो म्हणालास तर सायराही कदाचित हलाला करून घेण्यास तयार होईल…तू आमचा खरा मित्र आहेस….नानाप्रकारे याकुब अरविंदला विनवत होता.

खरंतर, अरविंदचे पूर्वीपासूनच सायरावर निस्वार्थ, मनस्वी प्रेम होते.

याकुबने सायरासमोर आपल्या प्रेमाचा विचार करण्याची गळ घातली….मी नाक घासतो…पण नाही म्हणू नकोस…अरविंद आपलाच मित्र आहे….माझा…तुझाही त्याच्यावर विश्वास आहे. तो आपल्याला मदत करायला तयार आहे…तू फक्त हो म्हण….अरविंद एका रात्रीपुरता लग्न करायला तयार झालाय यावर सायराचा विश्वासच बसत नव्हता …

“अरविंदला प्रथम इस्लाम धर्म स्विकारावा लागेल त्यानंतरच त्याचं लग्न सायराबरोबर लावता येईल”….मुल्लांनी याकुबला स्पष्ट सांगितले.

अरविंद धर्म बदलण्यासाठी तयार झाला…सर्व विधी पार पडले …अरविंदचे नाव “अरबाज” ठेवण्यात आले.

अरविंदच्या घरच्यांनी अरविंदशी संबंध तोडले….

मुल्लांनी अरबाज सायराचे लग्न लावले….याकुबने एका हॉटेलची रूम बूक केली होती …याकुब दोघांना तिथे सोडून आला…निघताना याकुबच्या डोळ्यांत पाणी होते …अरबाजचा हात घट्ट हातात धरला….सायराच्या नजरेला नजर न मिळवता याकुब निघून गेला…

सायरा, “मला माहिती आहे तुझे याकुबवर मनापासून प्रेम आहे. केवळ नाइलाजाने तू माझ्याशी लग्नाला तयार झालीस..” सायरा काहीच बोलली नाही…

खोलीत बराच वेळ शांतता होती…

अरविंद, “खरं खरं सांग….मी तुला आवडते ना…? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना…?” सायरा अरविंदला विचारत होती. होय…सायरा ….तू माझं पहिलं व अखेरचं प्रेम होतीस अन् मरेपर्यंत रहाणार आहेस….

तुला वाटलं असेल की, मी तुझ्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी, एका रात्रीसाठी का होइना आपली अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझं शरीरसुख घेण्यासाठी तुझ्याशी लग्न केलंय …

विश्वास ठेव….एकदाही माझ्या मनात असले विचार आले नाहीत….मी लग्न केलं कारण तुला परपुरूषासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवायला लागू नयेत म्हणून ….उद्या सकाळी आपण आपले शरीरसंबंध झाले असे समाजाला खोटं सांगायचं…

तुला मी तलाक देणार….मग तू परत आनंदाने याकुबबरोबर संसार कर….माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत.

अरबाजने तलाक दिल्यावर परत याकुब व सायराचे लग्न झाले.

अरबाजने परत आपल्या स्वधर्मात प्रवेश घेतला …परत एकदा अरविंद नाव धारण केले …

याकुबच्या डोक्यातून सायराने अरविंदसोबत घालवलेली रात्र काही केल्या जात नव्हती …अरविंदला शब्द दिल्याने सायरा याकुबला त्या रात्री नेमके काय घडलं ते सांगू शकत नव्हती… आणि जरी सांगितले असते तरी याकुबला कधीच पटले नसते…असंच एक वर्ष गेलं…याकुबचं मन खात होतं…याकुबला दारूच्या व्यसनाने घेरलं….परत सायरा व याकुबमध्ये खटके उडायला लागले ….अजूनही सायराला मूल झालेलं नव्हतं …माझ्यामध्ये काहीही दोष नाही…तूच “वांझोटी” आहेस….माझ्यातही दोष नाही…मी वांझोटी नाही..

सायराच्या मनात याकुबच्या व अरविंदच्या स्वभावाची तुलना होत राहिली …

एकदिवस याकुब दुसरं लग्न करून ‘शबनम’ या आपल्या दुसऱ्या पत्नीस घरी घेऊन आला. सायराला हा धक्का सहनच झाला नाही….याकुबसोबत कडाक्याचं भांडण झालं ….तू मला मूल देऊ शकत नाहीस….म्हणून मला दुसरं लग्न करावं लागलं….सायरालाही प्रचंड राग आला… याकुब प्रथम मला तलाक दे….मगच हिला घरात आण…..याकुबने परत सायराला तलाक दिला.

सायरा परत आपल्या वडीलांकडे आली….

अरविंदला सर्व हकिकत समजली….त्या रात्री काय घडलं ते सांगण्यासाठी अरविंद याकुबकडे जाण्यासाठी सायराच्या घरून निघतो…अनपेक्षितपणे सायरा अरविंदचा हात धरून ठेवते…”मला खरंच माहित नाही की, मी तुला मूल देऊ शकेन की नाही…तरी तू माझ्याशी लग्न करशील..?” या प्रश्नाला काय उत्तर द्यावे या विचारात बराच वेळ जातो….माझ्यासारख्या वांझोटीशी लग्न करशील का..? अत्यंत उद्वेगाने सायरा परत विचारते…अरविंद उत्तर देतो….मी ‘वांझोटी’शी नव्हे तर ‘सायरा’शी लग्न करायला तयार आहे. तीने मूल देवो अथवा न देवो…त्याने माझ्या प्रेमात काहीच फरक पडत नाही.

“माझ्या घरी “सायरा” म्हणून नव्हे तर “सावित्री” म्हणून यायची तयारी आहे..?”

“तू जर माझ्यासाठी ‘अरविंदचा’ ‘अरबाज’ होऊ शकतोस तर मी ही तुझ्यासाठी, तुझ्या निःस्वार्थी प्रेमासाठी ‘सायरा’ची ‘सावित्री’ होऊ शकते ….”

पुढे….सावित्रीला दोन मुलं होतात.

शबनम, याकुब अजूनही बाळासाठी प्रार्थना करत आहेत.

प्रसाद राजन क्षीरसागर

◆ कथा आठवणीतल्या : भाग एक ( अभिनव बसवर यांच्या लेखणीतून )