हे सगळं परदेशात घडतं, आपल्याकडे असं काही नसतं बुवा ? अप्रतिम लेख : अभिनव बसवर

0

हे सगळं परदेशात घडतं, आपल्याकडे असं काही नसतं बुवा ?

अल्लड वयामध्ये एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होतं. शरीरसबंध देखील ठेवले जातात. हार्मोन्स चा खेळ सगळा. आपल्याकडे या गोष्टी फारश्या उघडपणे बोलल्या जात नसल्या तरी घडत नाहीत असं अजिबात नाही. उत्तम संस्कार मुलांवर केले म्हणजे ते लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणारचं नाहीत असं अजिबात नाही.

पूर्वी प्रेग्नंट होण्याचे जास्त चान्सेस असायचे. गर्भपात व्हायचे. हल्ली मुलगी पाळी वेळेवर येत नाही म्हणून डॉक्टरकडे गेली तरी पहिले डॉक्टर प्रेग्नसी टेस्ट करायला लावतात. बॉयफ्रेंड आहे का ? प्रोटेक्शन वापरलेलं का असे प्रश्न अगदी सहज विचारतात.

कदाचित या गोष्टी ऐकायला गोड वाटत नाहीत किंवा जाणूनबुजून आपण या सगळ्याकडे कानाडोळा करतो. लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणार्यांपैकी काहीजण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ करतात. ज्यांना कधी संधीच नाही मिळाली ते दुसर्यांना दुषणे देतात. कोल्ह्याला द्राक्षे आंबट वगैरे…

दोन तीन रिलेशनशिप्स वर्क नाही झाल्या की आईवडिलांचा लाडका किंवा लाडकी आज्ञाधारक बाळासारखे बोहल्यावर चढतात तेव्हा भारी गंमत वाटते. पुढे हेच बाळ अरेंज मेरेज किती योग्य असतं याचे सर्रास दाखले देत इथे तिथे दांभिक उपदेशाच्या पिचकार्या मारताना दिसले तर आश्चर्य वाटू नये.

काही वर्षे गेली कि लग्नापूर्वीचे प्रेम आठवून दोन तीन पेग लावून त्याची किंवा तिची गळाभेट घेण्याची हुक्की देखील येते. संसाराचा गाडा ओढून थकल्यानंतर अचानक आतमधील मजनू जागा होतो. पोकळी वगैरे वाटू लागते आणि मन वढाय वढाय सुरु…

पोकळी/एकटेपण भरून काढण्यासाठी लग्नाबाहेरचे सबंध आलेच. ‘हे सगळं परदेशात सर्रास घडतं. आपल्याकडे असं काही नसतं बुवा’, असं जर कुणाला वाटत असेल तर भ्रमाचा भोपळा वेळीच फुटलेला चांगला.

– अभिनव बसवर

वेश्या – भाग १ : सिताराम सागरे यांच्या लेखणीतून