मुलींनो निदान एवढं तरी समजून घ्या…अप्रतिम लेख

0

मुलींनो निदान एवढं तरी समजून घ्या…

तू मांडलेल्या स्त्रिया शोषिक असतात असं मध्यंतरी मला बरेचजण सांगायचे. खंबीर, धाडसी स्त्रियांबद्दल का लिहित नाहीस की तुलासुद्धा स्त्री फक्त अन्याय सहन करणारीच भावते. आजकालच्या स्त्रिया बघ, बेधडक दारू वगैरे पितात, सिगारेट ओढतात, नवर्यालासुद्धा सहज अश्लील शिव्या देतात. स्त्रीच्या या बदललेल्या रुपाबद्दल तुला काहीच कसं मांडाव नाही वाटत.

मुळात स्त्रिया दारू, सिगारेट वगैरे घेतात या गोष्टींना परिवर्तनाशी जोडणं म्हणजेच भोंदुगिरी आहे. तंबाकू , मिश्री यापूर्वीही स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत होत्याचं. कंबरेला खोचलेल्या आजीबाईच्या पिशवीत पानाचा विडा,तंबाकू सहज सापडायचं. त्यामुळे हा विषय गौण ठरतो. आजपर्यंत आम्ही हेच केलं. स्त्रीच्या विद्वत्तेकडे पाहण्यापेक्षा तिच्या चारित्र्याकडे, व्यसनांकडे, आपसूक जाती धर्माकडे लक्ष केंद्रित केलं.

भारतीय नौदलातील सहा मुली जगाच्या सफरीवर निघाल्या ही बातमी जेव्हा आलेली तेव्हा बर्याच जणांना त्यात काही देणं घेणं नव्हतच. या मोहिमेचं नेतृत्व करतायत, लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशी. जोशी नाव आलं म्हणून पोटात त्रिशूल उठल्यासारख वाशिल्यावर गेली असेल अशा यथेच्छ भंपक बाता मारून झाल्या. आपल्याला बोटीतून नदी पार करताना पँटची टीप पुन्हा शिवावी लागते. इथे त्या पोरी सागराला टक्कर देतायत. आपल्या डोक्यातील जातीय किडे वापरून निदान ज्यांना काही माहित नाही त्यांची मने तरी कशाला कलुषित करायची…

पंडिता रमाबाई यांच्याबद्दल काही माहिती का ? असा प्रश्न केला तर बर्याच जणांना नाव देखील माहित नाही. आम्हाला सध्याच्या कर्तुत्व गाजवणार्या स्त्रिया आठवत नाहीत. पूर्वीच्या काय आठवणार. नशीब सावित्रीबाई फुले कोण होत्या इतकं तरी माहित आहे. रमाबाई रानडे म्हटलं की फक्त झी मराठीवरील उंच माझा झोका सिरीयल आठवते. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या दोन वेगवेळ्या व्यक्ती होत्या हे समजावून सांगण्यापासून सुरुवात करावी लागते.

पंडिता रमाबाई यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे त्याकाळी म्हणजे एकोणिसाव्या शतकात स्त्रियांबद्दल पुढारलेल्या विचारांचे होते. बायकोला आणि मुलीला चक्क संस्कृत शिकवलं. त्याकाळी ब्राह्मण घरातील या मुलीने शुद्र जातीतील व्यक्तीशी विवाह केला. पुढे धर्मांतर देखील केले. स्त्री शिक्षणासाठी, विधवांसाठी, वंचित स्त्रियांसाठी पतीच्या, आई वडिलांच्या मृत्युच्या नंतरही एकट्या झटल्या त्या.

साधं ब्रेकअप झालं तर आयुष्य उध्वस्त झाल्यासारखं बसतो आपण हल्ली. मुलाने खोटं प्रेम केलं म्हणून नस वगैरे कापून घेतो. पुरुष स्त्रीकडे वासनेच्या नजरेनेच पाहतो म्हणून घटस्फोटीत, विधवा स्वतःला आतल्या आत बंदिस्त करू पाहतात. स्त्री चा संघर्ष, बुद्धीची झेप, कर्तुत्व त्याकाळी देखील या स्त्रियांनी दाखवून दिलेलं आहे. निदान तेवढं तरी नीट समजून घ्या…. बाकी फेमिनिझम वगैरे हळू हळू समजून घेता येईल.

– अभिनव बसवर

निर्मला : कथा एका वेश्येची : मन सुन्न करणारी रेड लाईट एरियातील एका अभागी स्त्रीची व्यथा …