◆ कथा आठवणीतल्या : भाग पाच ( अभिनव बसवर यांच्या लेखणीतून )

0

कितीतरी वेळ मी तशीच सोप्यावर बसलेले. तोही बाल्कनीमध्ये उभा. थंड वारं सुटलेलं त्यामुळे उघड्या पायावर काटे आले, त्यात स्लीवलेस टोप. आतमध्ये जाऊन नाईट पँट आणि फुलस्लीव्ज कुडता घालून पुन्हा हाँल मध्ये आले. चेंज करताना याच्यासाठी केलेलं वँक्सीन पाहिल्यानंतर मनात थोडंस चर्रर्र झालं. काय करायला चाललेले मी. जाऊ दे, आता पुन्हा तो विचार नको. एकदा ठरवलंय ना की त्याला आपलसं करायचं. त्यानंतर पुढचं पुढे…

अजूनही हा तिथेच उभा. शांतता मिळाली असेल. मी नाईन्थ फ्लोअर ला राहते. मस्त हवेशीर. बिल्डींगच्या समोरून रेल्वे ट्रँक जातो. दर अर्ध्यातासाला रेल्वेचा आवाज असतोच. सगळ्या गाड्यांचं वेळापत्रक पाठ झालंय. रात्रीची रेल्वेची रिमझिम करणारी लाईट पाहताना कित्येकदा त्यात हरवून गेलीये. त्याच्या शेजारी जाऊन उभं राहूया म्हणलं. पाहूयात आता तरी शांत झालाय का. किती मस्त दिसतंंय समोर. दूरदूरपर्यंत खड्या बिल्डिंग्ज. त्या शांततेत सैरभैर झालेलं मन पुन्हा ट्रँकवर येतं…

आतमधून दोन चेअर्स घेऊन आले. बाल्कनीच्या स्लाईडिंग वर पाय टेकवून दोघं मस्त बसलो. इतक्या उंच राहत असल्यामुळे मच्छरांचा अजिबात त्रास नाही. मीच बोलायचं ठरवलं, “तुला आठवण येतीये तिची… ?” तो काहीच बोलला नाही. शून्यात नजर लावून बसलेला. ही जी डाव्या बाजूची बिल्डींग दिसतेय ना, पूर्वी मी तिथं राहायचे. सहा महिने झाले इकडे शिफ्ट होऊन. सेकण्ड फ्लोअर वरून डायरेकट नाइन्थ फ्लोअर. मस्त वाटतं पण. कामाचा सगळा थकवा निघून जातो. रात्री फँन लावण्याची सुद्धा गरज नाही पडत. अरे वारचं येतं एवढं. एखादं पुस्तक वाचत वाचत मस्त ताणून द्यायचं. कधी झोप लागते कळतही नाही. मी इतकी बडबड करतीये पण हा काहीच बोलत नव्हता…

तुला माहितेय, जेव्हा माझं ब्रेकअप झालेलं ना तेव्हा मी नुकतीच इंटर्न म्हणून आलेले आपल्या एजन्सीमध्ये. ते सगळं विसरायचं होतं म्हणून काम करण्याचं ठरवलं. इंटर्न तर इंटर्न. लगेच पैसा नाही मिळाला तरी चालेल पण काम हवं होतं. मीच नातं तोडायचं ठरवलेलं. तो मेक्यानिकल इंजिनियर, उत्तम कमवायचा. वेल सेटल्ड. त्याला माझ्यात सतत बायको हवी असायची. मैत्रीचं नातं कुठेच उरलं नव्हतं.

अजिबात पटायचं नाही आमचं. दोघांचे विचार वेगळे. कुठल्याचं मुद्द्यावर एकमत नाही. खूप प्रयत्न केला आम्ही जुळवून घ्यायचा पण सतत चिडचिड व्हायची. माझ्या आईलादेखील आमच्याबद्दल माहित होतं. तिलाही आवडायचा तो. चांगलाच होता रे पण वेव्हलेन्थ जुळायची नाही. त्याला जे हवं असायचं ते मला जमायचं नाही आणि मला ज्यात आवड असायची ते त्याला पटायचं नाही. सतत रुसवा फुगवा. इमोशनल ब्ल्याकमेलिंग…

सवय झालेली एकमेकांची. व्हाटसअप्प वर मिनिटा मिनिटाला मेसेजेस. त्याच्या ऑफिस मध्ये काय झालं की उगाच माझ्यावर राग काढणं. मी समजून घ्यायला हवं होतं हे आता मला वाटतं. पण वेळ निघून गेलीये. लहान होते, स्वतःचं खरं करायची सवय. जरा कोणी काही बोललं की राग यायचा. हा चिडला की चार चार दिवस मी बोलायचे नाही. सतत तो मनवायचा. तो जसा चिडायचा तसा समजूनही घ्यायचा पण मला सतत चिडणंचं दिसायचं. माणूस गमवल्यानंतर त्याची किंमत कळती रे. तो माझा होता तोपर्यंत हक्काने त्याला वाट्टेल ते बोलायचे. आता अगदी फोर्मल बोलतो आम्ही. सगळचं हातातून निघून गेलय…

(इतक्या वेळ शून्यात हरवलेला हा, पण आता त्याने माझ्याकडे पाहिलं. हातावर हात ठेवला.) मी चुकलेले मला मान्य आहेच . कदाचित वयाचा फरक पडला असेल. माहित नाही पण आता विचार करून काहीच फायदा नाही. आयुष्यात मी पुढं आलीये आणि आता मागे वळून बघता येणार नाही.

काल मी मुद्दामूनचं बाथरूमचं दार उघड ठेवलेलं. मला वाटत होतं की तू यावं. रात्री तू मला इतका चिटकून झोपला, क्षणभर विसरले मी सगळं. माझं चुकलंच. शरीराचं काय , कपडे काढले की ते नागडं होतं पण मनाचं तसं नाही ना. तुझ्यासमोर नागडं उभं राहण्यात मला थोडंही अवघडल्यासारखं नाही वाटलं. कपड्यांची बंधन गळून पडली. पण ती फक्त माझ्यासाठी हेच मी विसरलेले. चूक कळालीये मला. आय एम सॉरी….

डोळे पुसले आणि आतमध्ये निघाले तर त्यानं हात पकडून मला बसण्यास सांगितलं. खांद्यावर हात ठेवला आणि बारीकसा हसला. तेवढ्यात रिमझिम लाईट घेऊन ट्रेन आली. ती पाहण्यात क्षणभर दोघेही हरवून गेलो.

#क्रमशः…

– अभिनव ब. बसवर

◆ कथा आठवणीतल्या : भाग चार ( अभिनव बसवर यांच्या लेखणीतून )