◆ कथा आठवणीतल्या : भाग सहा ( अभिनव बसवर यांच्या लेखणीतून )

0

बेडरूममध्ये तिने जवळ येऊन किस करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिच्यावर नाराज नव्हतोच मी. उगाच मनाला लावून घेतलं तिने. तिची काय चूक. बघता बघता डोळ्यातून पाणी आलं बिचारीच्या, तरी मी मुर्खासारखा माझ्याचं विचारात हरवलेलो. हल्ली सतत अशीच तंद्री लागते. कामाची टेंशनस कमी असतात त्यात हे पर्सनल कुटाणे.

इथे वारं खूप छान लागतं म्हणून मन रमलं. समोर दिसणाऱ्या प्रत्येक बाल्कनीमध्ये एक कथा दडलीए. शेवटी माझा पिंड कलाकाराचा, त्यामुळे उगाच बारीक निरखून पाहत होतो सगळं. संध्याकाळपासून चार पाच ट्रेन तरी गेल्याचं. ते धड धड सुद्धा अगदी रिदममध्ये वाजतं, हृदयाच्या ठोक्यासारखं. नॉस्टलजिक करून टाकतंं सगळं…

डोळे ओले करून आतमध्ये निघून चाललेली. बस म्हणलं. एवढं छान वातावरण आहे आणि रडतेस काय वेड्यासारखी. मला काही हर्ट वगैरे नाही झालं तुझं वागणं. अगं खरंच. कसं सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेन. हे बघ, बाथरूममध्ये मी तुला तसं पाहिलं, ते आता मला आवडलं नाही असं अजिबात नाही. इतकी सुंदर आहेस तू. कोणाला नाही आवडणार. माझी मनस्थिती ठीक नव्हती एवढंंच. तू स्वतःला दोषी वगैरे नको मानू. मनातलं घडाघडा बोलली ते चांगलं केलंस. उगाच कशाला साठवून ठेवायचं. जितकं साठल तितकं सडतचं शेवटी…

आता माझंच बघ ना. सेक्स म्हणजे नेमकं काय असतं यातलं घंटा काही कळत नव्हतं तेव्हापासून ओळखतो आम्ही एकमेकांना. शेजारी राहायची आमच्या. संध्याकाळी अंगणात बडमिंटन वगैरे खेळायचो. स्कर्ट घालायला फार आवडायचं तिला.एकदम गोड दिसायची. गोरे गोरे पाय, फुगेदार स्कर्ट.

एकदा पाणी सांडलेल फरशीवर, घसरून पडली आणि चुकून तिची इनरवेअर मला दिसली.चेहरा कावरा बावरा झाला अगदीच. मीच काही पाहिलं नाही असं दाखवलं आणि नजर फिरवली. कशाला तिला अवघडल्यासारखं वाटू द्यायचं. तेव्हापासून आमचं चांगलं जमू लागलं मात्र. एकप्रकारचा विश्वास आला. पुढे कॉलेजमध्येही आम्ही एकत्रच. प्रेमात वगैरे कसे पडलो दोघांनाही आठवत नाही. कधी प्रोपोजही केलं नाही.

फर्स्ट टाईम सेक्स केलं तेव्हा तर थोडंंस रक्त आलं म्हणून मी घाबरलो अक्षरशः. पहिलीच वेळ आणि सगळचं नवखं. मोठ्या रुबाबात तिच्या समोर शायनिंग मारली खरी पण सगळीच आकड निघाली. एकवीस वगैरे वय असेल. तुला काहीच येत नाही म्हणून फिदीफिदी हसलेली माझ्यावर.ते हसणं आजही आठवतं. कपल आहोत म्हणून उगाच हातात हात घालून फिरणं वगैरे नाही आवडायचं आम्हाला. दिवसभर कॉलेजमध्ये एकत्रच त्यामुळे सगळ बोलणं तिथेच. रात्री फक्त गुड नाईट म्हणण्यापुरतं मेसेज करायचो…

सहा वर्ष झालेली रिलेशनला. एकमेकांना गृहीत धरणं महागात पडलं. ती मला सोडून गेली यात पूर्णपणे तिची चूक आहे असं नाहीये. मी पण समजून घेण्यात खूप कमी पडलोय. जिथे हळूवार वागण्याची गरज होती तिथे चिडचिड केली. प्रियकराच्या भूमिकेत शिरताना माझ्यातला मित्र हरवून गेला. हक्क गाजवताना तिच्यातली मैत्रीण मी गमावतोय हे मला कळालंच नाही. नात्यांमध्ये एकदा अंतर आलं की ते मिटवणं फार अवघड. मनं दुखावली की कितीही मलमपट्टी करा काही उपयोग नाही…

तू समजून घे यार. गेल्या दोन दिवसात आपल्यात जे घडतंय ते खरंच प्रेम आहे का. इतके सहज प्रेमात पडू शकतो का आपण. सेक्स करताना डोळे बंद केले की तिचा चेहरा समोर येणार असेल तर ते का करावं. मन तिच्यात अडकलेलं असताना शरीर तुझ्यात का गुंतवावं. तुझी फसवणूक होईल ती. काल रात्री मलाही जाग आलेली. माझा हात तुला बिलगलेला. पायानं अजूनच माझ्या जवळ तुला ओढलेलं. त्या मिठीत मला तिची उब जाणवली. नकळत माझं तोंड तुझ्या छातीशी कवटाळलं गेलं असेल पण ओढ तिची होती…

माझं असणं जोपर्यंत तिच्या श्वासांनी व्यापलंय तोपर्यंत आपलं नात व्हेंटीलेटरवरचं राहणार. आपल्याला ऑक्सिजन शोधावा लागेल. तो असा एका रात्रीत नाही मिळणार. कदाचित ही घुसमट नवीन नातं फुलवेल. अजून ओढ वाढवेल. बीज रुजलेलं नसताना पाणी टाकून काय फायदा. अशानं ते सडणार नाही का. एकमेकांना समजून घ्यायला हवं आपण. खरंच आपलं किती जमू शकेल हे तपासून पाहावं लागेल. मोहात पडणं सोपं असलं तरी जबाबदारी पेलता यायला हवी. नातं निभावणंं देखील जमलं पाहिजे…

ती छान हसली. गालावरची लाल शेड अजूनच खुललेली. थंड हवेमुळ अजूनच फ्रेश वाटलं.तिने देखील माझा हात हातात घेतला आणि सहमती दर्शवली. अंधारातही चेहर्यावर एक वेगळीच चमक जाणवली. आता आमची रेल्वेगाडी ट्रँकवर व्यवस्थित धावली म्हणजे देव पावला म्हणायचा…

#समाप्त…

– अभिनव ब. बसवर

◆ कथा आठवणीतल्या : भाग पाच ( अभिनव बसवर यांच्या लेखणीतून )